Helpline Number: +919420722107 | +917212573255

Email: sevankur@gmail.com

Contact No. 9021591789, 07212573255, +919420722107

Categories
Uncategorized

मधमाशांचे तारणहार : गोपाल पालीवाल, वर्धा

एकही मधमाशी न मारता व एकही मधमाशांचे पोळे न जाळता/नष्ट न करता, पर्यावरणपूरक मधसंकलनाचे नविन तंत्र विकसित केलेले व देशभरात हजारो आदिवासी व ग्रामीण तरुणांना त्याद्वारे रोजगार उपलब्ध करुन देण्याचे अतिशय महत्वाचे काम वर्धा येथील संशोधक श्री गोपाल पालीवाल यांनी केलेले आहे. त्यांनी वर्धा जिल्हयातील आग्यामोहोळाच्या मधमाशीचा मेंदू व जननसंस्था या विषयामध्ये पी.एच.डी. केलेले. मुळात मध हा काही सर्वसामान्यांचा दैनंदिन विषय नाही. त्यातही आग्यामोहोळ तर अगदीच नजरेच्या पलीकडला विषय. मात्र मधापेक्षाही एकूणच शेती व जंगलातील परागीकरणाचे अत्यंत महत्वाचे काम या मधमाशा करीत असतात व म्हणूनच आपल्या सर्व अन्नसाखळीमध्ये त्यांचे अतिशय महत्वाचे स्थान आहे हे आपल्यापैकी अनेकांना माहितीच नसते. अशा तुलनेने अपरिचित व दुर्लक्षित विषयात त्यांनी मूलभूत संशोधन केलेले. त्यांच्या या संशोधनाचा परिणाम म्हणून व त्यांनी शोधून काढलेल्या मधसंकलनाच्या नवीन पद्धतीमुळे ३० हजार मधमाशांचे नैसर्गिक पोळे, जाळण्या/नष्ट होण्यापासून वाचले जातात. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, झारखंड, छत्तीसगड, आंध्रप्रदेश, ओरीसा इ. राज्यांमधील एकूण २७ जिल्हयांमधील, २४ संस्थांच्या माध्यमातून त्यांनी २२०० आदिवासी व ग्रामीण तरुणांना पर्यावरणपूरक मधसंकलन तंत्रज्ञान प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करुन दिल्या. परिणामी या सर्व ठिकाणाहून दरवर्षी साडेसतरा कोटी रुपये बाजारमूल्य असलेले १२०० ते १५०० क्विंटल मध संकलित केल्या जाते. तर केवळ मधसंकलनच्या कामाचा मोबदला म्हणून जवळपास एक कोटी रुपयांचा रोजगार या आदिवासी व ग्रामीण तरुणांना उपलब्ध झाला आहे.
त्यांच्या या विषयातील प्रवेशाला निमित्त ठरले ते नागपूरला एमएस्सी झाल्यानंतर त्यांच्या शिक्षकांकडून त्यांना वर्धेच्या ग्रामोपयोगी विज्ञान केंद्र या विज्ञान तंत्रज्ञान विषयात काम करणाऱ्या संस्थेमध्ये फेलो म्हणून काम करण्याबाबत सुचविले गेलेले. पाच वर्षे गोपाळने तेथे काम केले व पीएचडीचे कामही सुरु होते. ५-६ राज्यात फिरणे झाले. या प्रवासात त्याने बघितले कि सर्वत्र मध गोळा करणारे अत्यंत क्रूर पद्धतीने मध गोळा करतात. मधमाशांच्या पोळ्याला आग लावली जाते, ज्यात हजारो मधमाशा मरतात; त्यांचे पोळे खाली पाडले गेल्याने त्यांचे घर कायमचे नष्ट होते. अशा रीतीने गोळा होणाऱ्या मधाचे प्रमाणही खूपच कमी असते. हे सर्व बदलण्याचा गोपाळने निश्चय केला.
पीएचडी पूर्ण झाल्यावर पुढे त्याचा गडचिरोली जिल्ह्यातील मेंढालेखा या ५०० लोकवस्तीच्या पूर्णतः आदिवासी गावाशी संबंध आला व तेथूनच खऱ्या अर्थाने मधसंकलनाच्या नवीन पद्धतीचा शोध सुरु झाला. मेंढालेखा हे गाव “दिल्ली मुंबईत आमचे सरकार व आमच्या गावात आम्हीच सरकार” या घोषणेने जगाच्या नकाशावर प्रसिद्धीला आलेले. ग्रामस्वराज्याचे विविध प्रयोग या गावात “देवाजी तोफा” या आदिवासी कार्यकर्त्याचा नेतृत्वात गावाने केलेले. गोपाळ जंगल अभ्यास गटाच्या निमित्ताने या गावाशी याकाळात जोडल्या गेला. यादरम्यान मध संकलनाची प्रचलित अघोरी पद्धत बदलण्याच्या दृष्टीने स्थानिक आदिवासी तरुणासोबत एकत्रितपणे अनेक प्रयोग केले गेलेत. त्यातून एक नवीन प्रकारचा ड्रेस, जो आज देशभरात मध संकलन करणारे वापरतात त्याचा शोध लागला. सर्वांग झाकून टाकणारा व शरीराला फिट बसणार हा ड्रेस एका विशिष्ट्य जाड मटेरिअलपासून बनविलेला, ज्यामधून मधमाशीचा डंख होऊ शकणार नाही याप्रकारे बनविल्या गेलेला. झाडावर वावरताना सहज व सोपा असा तो झाला. तसेच चढण्यासाठी दोराचा वापर करण्याचे पद्धती पण येथे प्रथमच सुरु केली गेली. त्याआधी झाडावर तसेच चढून मध काढल्या जायचे व त्यात कित्येक संकलक झाडावरून खाली पडून जखमी व्हायचेय, ते दोर वापरल्याने जवळपास थांबलेच. तिसरा बदल जो त्यांनी केला तो मधमाशीचे पोळे न जाळता व नष्ट न करता केवळ पोळ्याच्या वरच्या ७० % भाग अलगद कापून घेऊन उर्वरित खालचा ३० % भाग हा तसाच कायम ठेवून द्यायचा. कारण मधाचा साठा हा फक्त पोळ्याच्या या वरच्या भागात असतो, तर खालच्या भागात माशांचे निवासस्थान असते. त्यामुळे माशांच्या घरांना अजिबात धक्का न लावता फक्त मधाचा साठा तेवढा काढून घेण्याची नवी पद्धत शोधल्या गेल्याने एकही मधमाशी मारण्याची गरज राहिली नाही. पोळेही कायम राहिल्याने या माशा महिन्याभरातच पुन्हा मधसंकलन करून वरचा मधाचा साठा पूर्ववत भरून काढतात. त्यामुळे एकाच पोळ्यापासून मधाचे किमान तीन वेळा संकलन करता येऊन उत्पादनातही भर पडली. आज देशभरात या पद्धतीनेच मध संकलित केला जातो.
मधमाश्यांचे जीवन/त्यांचे वर्तन आणि पर्यावरण पूरक मधसंकलन तंत्रज्ञान या संदर्भात अनेक राष्ट्रीय/आतंरराष्ट्रीय कार्यशाळा व संमेलनांमध्ये तसेच आग्यामोहोळच्या मधाबाबत प्रचार व प्रसारसाठी अनेक स्थानिक/ राष्ट्रीय/ आतंरराष्ट्रीय पातळीवर व्यवसाय मेळ्यांमध्ये त्यांचा सहभाग राहिलेला आहे. व्हिएतनाम, हॉलन्ड, जर्मनी, ब्राझील इ. देशांमध्ये मधमाशांबद्दल सल्लागार/ अभ्यासक म्हणून त्यांनी दौरे केलेले आहेत. तसेच राष्ट्रीय कारीगर पंचायत, मध्यवर्ती मधमाशी संशोधन व प्रशिक्षण संस्था, WWF, डिपार्टमेन्ट ऑफ सायन्स ऍन्ड टेकनॉलॉजी इ. अनेेक संस्था/विभागांशी निगडीत असलेले गोपाल पालीवाल यांनी, स्वत:च्या कामाद्वारे इतरांना रोजगार व नवी दिशा देण्याचा आदर्श उभा केला.
संपर्क :  गोपाळ पालीवाल, ९, देशपांडे लेआऊट, नालवाडी, वर्धा मोबा. ९४२३४२०४८५

Leave a Reply

Add address