Category: Fittnesss
माणसाला आपले आयुष्य कसे लांबविता येईल व तारुण्य दिर्घकाळपर्यंत कसे टिकविता येईल यासंदर्भात आज जगामध्ये भरपूर संशोधन सुरू आहे. माणसाची आर्युमर्यादा तर एकीकडे बरीच वाढलेली आहे. या वाढत्या आर्युमर्यादेसोबतच उच्च रक्तदाब, मधुमेह, हार्ट अटॅक यासारख्या आजारांचे प्रमाणसुध्दा वाढते आहे. त्यामुळे मिळालेले जास्तीचे आयुष्य निरामय कसे जगता येईल हा जगभरातील संशोधकांच्या संशोधनाचा महत्वाचा विषय बनलेला आहे. यासाठी काय करायला हवे याचे स्पष्ट दिशा दिग्दर्शन, आतापर्यंतच्या संशोधनाद्वारे करण्याच्या स्थितीमध्ये आता विज्ञान येवून पोहचलेले आहे.
या संदर्भामधील संशोधनातून असं लक्षात आलं की, जगामध्ये सगळ्यात जास्त शतकवीर, म्हणजे शंभरी पार केलेल्या व्यक्तींची संख्या, दक्षिण रशियामधील जॉर्जिया या प्रांतामधील अबखासीया या, कॉकेशस पर्वत रांगानी व्यापलेल्या पर्वतीय प्रदेशामध्ये राहणार्या जनजातीय लोकांमध्ये आहे. जगातील इतर कोणत्याही ठिकाणापेक्षा या लोकांमध्ये शंभर वर्षापेक्षा जास्त जगणार्या व्यक्तींची संख्या काही पटीने अधिक आहे. त्यामुळे संशोधकांचं आणि डॉक्टरांचं लक्ष या विशिष्ट जमातीकडे वेधल्या गेलं. या लोकांच्या जीवनशैलीमध्ये अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्यामुळे ते दिर्घकाळपर्यंत आणि निरोगी जगतात, यासाठी त्यांच्या जीवनशैलीचा अभ्यास केला गेला. या अभ्यासामधून या लोकांच्या दिर्घायू जगण्याचं आणि तारूण्य टिकविण्याचं रहस्य लक्षात आलं. त्यांच्या जगण्यामध्ये प्रामुख्याने चार तत्वं शास्त्रज्ञांना आढळली.
ही चार तत्वे जगामध्ये इतरत्रही दिर्घकाळ जगणार्या व आपले तारुण्य टिकवून ठेवणार्या लोकांच्या जीवनशैलीच्या अभ्यासातून स्पष्ट झालेली आहेत. अगदी आपल्या गावातील ८०-९० वय गाठलेल्या व्यक्तीच्या जीवनाचा अभ्यास केला तरी, या तत्वांची पुष्टी आपल्याला स्वत:ला करुन घेणे पण सहज शक्य आहे. त्या तत्वांचा आपल्याला आपल्या जीवनामध्ये अवलंब ज्या प्रमाणात करता येईल, त्या प्रमाणात आपल्यालाही दिर्घकाळ पर्यंत निरामय जीवन जगता येईल व तारूण्यसुध्दा टिकविता येईल ही खात्री देता येवू शकते. ती तत्वे कोणती हे आपण समजून घेऊ या.
१. शास्त्रज्ञांना हे आढळून आलं की येथील लोकांचा आहार हा ताजा व स्वच्छ आहे. (Clean & Fresh Diet) दिर्घायू बनण्यासाठी आणि तारूण्य टिकवण्यासाठी ताजा आणि स्वच्छ आहार हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. शेतामध्ये पिकलेला भाजीपाला वा फळे, कुठल्याही प्रकारे साठवणूक न करता वापरणे, म्हणजे ताजेपणा होय. याचा अर्थ निसर्गामध्ये खाण्याची वस्तू तयार होणे व आपल्या आहारामध्ये तिचा प्रत्यक्ष समावेश होणे, यामधील कालावधी हा कमीत कमी असणे म्हणजे ताजेपणा. दिर्घकाळपर्यंत ताजेपणा टिकवून राहण्यासाठी वेगवेगळ्या रसायनांचा, प्रिजर्वेटीव्हचा वा अन्य निरनिराळ्या पध्दतींचा वापर करणे, म्हणजे ताजेपणा नव्हे. आज बहुतेक सगळ्याच खाद्य पदार्थांवर वेगवेगळ्या प्रक्रियांचा अवलंब मुख्यत्वे वाहतुकीच्या सोयीसाठी आणि दिर्घकाळ पर्यत टिकवण्यासाठी केला जातो. त्यामुळे त्यांचे पोषणमूल्य तर कमी होतेच. शिवाय या सर्व रसायनांचे मानवी आरोग्यावर विपरित परिणाम होतात. म्हणून अशा प्रक्रियायुक्त पदार्थाचा वापर कमीत कमी करायला हवा. अगदी फ्रिजमध्ये ताजे दिसत असणारे पदार्थ सुध्दा ताजे नव्हेत.
निसर्गामध्ये ज्या अवस्थेमध्ये खाद्यपदार्थ तयार होतात, तेथून प्रत्यक्ष मानवी वापराची सुरवात, यामधला कालावधी कमीत कमी असण्यासाठी गरजेचं असेल की, आपले खाद्य-पदार्थ हे आपल्या परिसरातच तयार झालेले असावेत. कुठेतरी दूरवर जगाच्या कोपर्यात पिकविले गेलेले फळ किवा अन्य खाद्यपदार्थ, शेकडो-हजारो किलोमीटर लांबवरच्या लोकांना वापरता यावे यासाठी कराव्या लागणार्या प्रक्रिया मानवी आरोग्यासाठी हानीकारक असतात. त्यामुळे आपल्या परिसरात तयार होणारी, पिकविल्या जाणारी फळे व भाजीपाला, तसेच ज्या सिझनमध्ये ती तयार होतात त्याच काळात ती वापरणे म्हणजे ताजेपणा होय.
गांधीजीनी यासंदर्भात एक फार सोपे सूत्र सांगितले आहे. त्याहून सोपे आहार शास्त्र काही असू शकत नाही. गांधीजी असे म्हणतात की, ज्या वस्तू नासतात, सडतात, खराब होऊ शकतात त्या वस्तू आरोग्यासाठी चांगल्या असतात. ज्या वस्तू खूप दिवस न नासता, न खराब होता टिकून राहतात, बहुधा त्या गोष्टी आरोग्यासाठी चांगल्या नसतात. उदा. आज तयार केलेली पोळी, भाकरी, भात उद्या शिळा होतो व त्यावर लगेच बुरशी येते व ते खाण्यालायक उरत नाही. म्हणजेच पोळी, भाकरी, भात खाणे आरोग्यासाठी चांगले आहे. या उलट कारखान्यात तयार झालेले बिस्कीट किंवा वेगवेगळ्या पॅकींगच्या वस्तु ज्या खूप दिवस पर्यंत चांगल्या राहतात, खराब होत नाही अशा गोष्टी आरोग्यासाठी चांगल्या नसतात. त्या ताज्या दिसत असल्या तरी त्यातील ताजेपणा संपलेला असतो.
आपल्या ताजेपणाच्या संकल्पना अर्धवट आहेत. बहुतेक घरांमध्ये अशी पध्दत दिसते की, नळ आलेत की, पिण्याचे पाणी भरताना कालचे भरलेले पाणी हे सांडून दिल्या जाते व ताजे पाणी भरल्या जाते. जर पाण्याच्या संदर्भामध्ये ताजेपणाची अशी संकल्पना आपण वापरतो तर ती आपल्याला आहाराच्या बाबत सुध्दा वापरायला पाहिजे. अशा पध्दतीचा ताजा आहार माणसाचे आयुष्य वाढविते व तारूण्य टिकवते.
आहारा संदर्भात दुसरा मुद्दा म्हणजे स्वच्छ असणे. स्वच्छ याचा अर्थ केवळ दिसायला स्वच्छ असा नाही. तर ज्यामध्ये मूळ पदार्थाशिवाय इतर कुठल्याही गोष्टी नाहीत ते अन्न म्हणजे स्वच्छ होय. आज ज्या वस्तु स्वच्छ दिसतात त्या बहुदा स्वच्छ नसतात; (उदा. बहुतेक सर्व पॅकींगच्या वस्तू) कारण त्या स्वच्छ दिसण्यासाठी त्यांच्यावर खूप सार्या प्रक्रिया कराव्या लागतात वा त्यामध्ये वेगवेगळी रसायने वापरावी लागतात. असे अन्न म्हणजे अस्वच्छ अन्न. त्यामुळे नैसर्गिक अवस्थेमध्ये कोणत्याही रसायनांशिवाय तयार होणारा भाजीपाला व फळे वापरणे मानवी आरोग्यासाठी चांगले आहे. वेगवेगळी रसायने वापरून पिकवल्या जाणार्या, शेतीमधील धान्य, डाळी, भाज्य-फळे हे स्वच्छ नाहीत. त्यामुळे रसायनमुक्त अन्न म्हणजे स्वच्छ अन्न हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. अशा रसायनमुक्त व नैसर्गिक पध्दतीने तयार होणार्या खाद्य पदार्थाच्या सेवनाने माणसाचे आयुष्य वाढविता येते व तारूण्य टिकवता येते असं आज विज्ञान सांगते आहे.
२. दिर्घायू होण्यासाठी आणि तारूण्य टिकवण्यासाठी दुसरे महत्वाचे तत्वजे शास्त्रज्ञांना आढळले ते म्हणजे, तेथील समाजातील लोक अखेरपर्यंत शरीरश्रम करतात. अगदी एकशे दोन वर्षाचा म्हातारा सुध्दा, तास-दोन तास शेतीमध्ये काम करतो. शंभर वर्षाची म्हातारी सुध्दा तास दोन तास घोड्यावरून रपेट मारून येते; घोड्यावर बसणे हा तेथील लोकांचा छंद आहे. याचाच अर्थ घाम गाळल्याशिवाय माणसाला आयुष्य वाढविता येत नाही वा तारूण्य टिकवता येत नाही. दुदैवाने आज आमचे सगळे प्रयत्न हे घाम कमीत कमी निघावा या दिशेने सुरू आहेत. आजच्या विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगामध्ये मानवी शरीरश्रम दिवसेंदिवस कमी होत चालले आहेत. त्यामुळे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम झालेला आहे. आजच्या जगाचे मुख्य आजार म्हणजे हार्ट अटॅक, ब्लडप्रेशर वाढलेले असणे, डायबिटीस, वजन प्रमाणापेक्षा जास्त असणे व लठ्ठपणा, हे सर्व शरीरश्रमाच्या अभावामुळे निर्माण होणारे आजार आहेत. शरीरश्रम केल्याशिवाय माणसाला दिर्घायू होता येत नाही व तारूण्य टिकवून ठेवता येत नाही. त्यामुळे आपल्या जगण्यामध्ये शरीरश्रमाचे महत्व लक्षात घेऊन आपल्या दिनचर्येमध्ये ते नियमाने कसे करता येतील हे ज्याचे त्याने ठरवायला पाहिजे.
आज शरीरश्रमापेक्षा बौध्दिक श्रमाला जास्त महत्व व किमत आलेली आहे. शरीरश्रमाला हलके मानले जाते. हा फरक कमी करणे एकूणच मानवी आरोग्यासाठी गरजेचे आहे. खासकरुन प्रत्येकाने जर उत्पादक श्रम आपल्या दिनचर्येचा भाग बनविला तर, आज समाजामध्ये दिसणारी वेगवेगळ्या प्रकारची विषमता सुध्दा कमी होईल. सर्वांचेच आरोग्य सुधारेल.
बैठी जीवनशैली असणार्यांसाठी शरीरश्रम हे अमृत व संजीवनी देणारे औषध आहे. त्यामुळे दिनचर्येमध्ये शरीरश्रम करत राहणे वा तशाप्रकारची जीवनशैली शक्य नसेल तर, जाणिवपूर्वक व्यायामासाठी वेळ राखून ठेवणे अतिशय महत्वाचे आहे. असे केले तरच आपल्याला वाढत्या वयासोबत होणारे आजार टाळता येणे शक्य होईल.
३. तिसरा मुद्दा जो त्या समाजाच्या अभ्यासामधून लक्षात आला तो म्हणजे त्या समाजामध्ये पारस्पारिकता आहे. परस्परांमध्ये घट्ट संबंध व एक-दुसर्याच्या सुख-दु:खामध्ये सहभागी होण्याची वृत्ती मोठ्या प्रमाणावर आहे. त्या जमातीच्या दिर्घायू जगण्याचे आणि तारूण्य टिकवण्यामागचे हे तिसरे रहस्य आहे. इंग्रजीमध्ये ज्याला ‘शेअरींग ऍन्ड केअरींग’ म्हणतात ते केल्याशिवाय माणसाला आपले आयुष्य वाढविता येत नाही वा तारूण्य टिकविता येत नाही असं आज आपल्याला विज्ञान सांगते. दुदैवाने आज आम्ही ना तर सुख वाटून घेत, ना तर दु:ख; प्रत्येकजन आपापल्या स्वार्थी आणि आत्मकेंद्रित वर्तुळात जगण्यामध्ये मशगुल झालेला आहे. अशाप्रकारच्या आत्मकेंद्रित जगण्याने आपले आयुष्य कमी होते व म्हातारपण लवकर येवू शकते हे लक्षात घ्यायला पाहिजे; आणि मग आमची इच्छा असो वा नसो, आम्हाला जर मग लवकर मरायचं नाही आणि लवकर म्हातारं व्हायचं नाही, तर मग स्वत:ची व इतरांची सुख-दु:ख वाटून घ्यायला शिकावं लागेलं. हे केलं तरच आमचं आरोग्यसुध्दा टिकविता येऊ शकेल.
आज वाढत्या औद्योगिकरणामुळे शहरीकरण वाढत आहे. एकूणच जगणे सुपरफास्ट होत चाललेले आहे. जागतिकीकरण व मुक्त अर्थव्यवस्थेच्या रेट्यामुळे व वाढत्या चंगळवादापायी मानवी जीवनातील सहजता संपत चालली आहे. मानसिक तणाव वाढत चालला आहे. मानवी नात्याची वीण पार उसवून चुकली आहे. त्यामुळे आयुष्याची लांबी वाढूनही, वाढीव आयुष्यात सुख भोगणे माणसाच्या नशीबामध्ये दिसत नाही. या सगळ्यांचा विचार करता माणसाला आपल्या आयुष्याची लांबी वाढवितांना, आयुष्याची खोली कशी वाढविता र्यईल याचासुध्दा विचार करणे अगत्याचे झाले आहे.
४. चौथा मुद्दा जो लक्षात आला तो म्हणजे त्या लोकांच्या जगण्यामागे दिर्घकाळ आणि निरामय आयुष्य जगणे हा हेतू आहे. म्हणून ते लोक दिर्घायू होतात व तारूण्य टिकवितात. याचाच अर्थ माणसाला दिर्घायू होण्यासाठी आणि तारूण्य टिकविण्यासाठी जगण्याचा हेतू शोधायला हवा. ज्यांच्या जगण्यामागे काही हेतू आहे तेच लोक जास्त काळपर्यत जगू शकतात व म्हातारपण दूर ठेवू शकतात. मग माझ्या जगण्याचा हेतू काय आहे ? असा प्रश्न आमच्या पैकी किती लोकांना पडतो ? केवळ मरत नाही म्हणून जगतो आहे, अशाप्रकारचे जगणे आज आमच्या पैकी अनेकंाचे सुरू आहे. त्यामुळे आम्हाला आमच्या जगण्याचा हेतू शोधता येणं अत्यंत जरुरीचे बनले आहे. ते करता आले तरच आम्हाला आमचे आयुष्य वाढविता येईल व म्हातारपण दूर ठेवता येईल असं आज विज्ञान सांगते.
त्यादृष्टीने आम्हाला आमच्या जीवनामध्ये दोन प्रकारे शोध घेता यायला पाहिजे. एक म्हणजे जसे आपल्याला माहिती आहे की या जगामध्ये राहणार्या सहाशे कोटी लोकांपैकी कोणत्याही दोन व्यक्तींच्या अंगठ्याचे ठसे सुध्दा सारखे नसतात. मग जर एवढ्या लोकांमध्ये दोन व्यक्तींचे अंगठ्याचे ठसे सुध्दा सारखे नाहीत, याचाच अर्थ माझ्यामध्ये काहीतरी वेगळेपण आहे, जे जगामधील अन्य कोणत्याही व्यक्तीमध्ये नाही. (देअर ईज समथींग स्पेशल इन माय सेल्फ) त्यामुळे माझ्यामध्ये काय वेगळेपण आहे, काय स्पेशल आहे, याचा शोध घेणे हा माणसाचा जगण्याचा हेतू असू शकतो. एका बाजूने माझ्यामध्ये असे काय आहे की, जे जगामध्ये इतर कोणामध्येच नाही याचा शोध घेणे आणि दुसर्या बाजूने एवढ्या सगळ्या विविधता असतानांसुध्दा आमच्या सगळ्यांमध्ये काहीतरी समान आहे; (देअर ईज समथींग कॉमन अमँगस्ट अवरसेल्फ) मग हे कॉमन, हे समानत्व कोणते आहे याचा शोध घेणे. अशाप्रकारे एका बाजूने माझ्यामध्ये स्पेशल, माझ्यामध्ये काय वेगळेपण आहे याचा शोध घेणे आणि दुसर्या बाजूने आपल्या सगळ्यांमध्ये काय समानत्व आहे याचा शोध घेणे माणसाच्या जगण्याला अर्थ देतो. कदाचित हा माणसाच्या जगण्याचा हेतू असावा. असा शोध लागणे इतर प्राणीमात्रांना शक्य नाही. माणूस मात्र असा शोध निश्चित घेऊ शकतो. असा शोध जर घ्यायला सुरुवात केली तर आमच्या आयुष्याची लांबी आणि खोली सुध्दा आपोआप वाढेल.
या सगळ्या तत्वांचे आपल्या जीवनशैलीमध्ये जागरुकतेने व डोळसपणे पालन करता आले तर, दिर्घायू बनने व तारूण्य टिकवून ठेवणे पूर्णपणे आपल्या हातामध्ये आहे असे आज विज्ञान आपल्याला सांगत आहे.